नाशिकमध्ये अस्तित्वाची लढाई! कोण मारेन बाजी? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राजकीय तापमान चढले
नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. प्रत्येक मतदारसंघात मोठमोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. सत्ता, प्रतिष्ठा आणि अस्तित्व या तिन्हींसाठी आता जोरदार लढत रंगणार आहे.
सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर सांगळे गटाने जोरदार आव्हान उभे केले असून, या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत. येवला तालुक्यात मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाजाच्या संघटनांनी एकत्र येत आव्हान उभे केले आहे. या चढाओढीमुळे येवलेतील निवडणूक समीकरणात मोठा बदल दिसून येऊ शकतो.
तर नांदगावमध्ये सुहास अण्णा कांदे यांच्या बालेकिल्ल्यात एकतर्फी निवडणुकीच्या चर्चेला उधाण आले आहे. विरोधकांचा प्रभाव कमी असून, कांदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील या निवडणुका म्हणजे केवळ सत्ता परिवर्तन नव्हे, तर अनेक नेत्यांच्या अस्तित्वाची आणि नेतृत्व क्षमतेची खरी कसोटी ठरणार आहेत. ग्रामीण भागात नेत्यांचे दौरे, सभा आणि सोशल मीडियावरील प्रचारामुळे जनतेत मोठी चर्चा रंगली आहे.