LOKसंघर्षलोकसंघर्ष - सत्य सांगणारं, एकमेव विश्वसनीय वृत्तपत्र

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत देवनार कॉलनी मनपा शाळा क्र. ०१ च्या श्रीमती मनिषा बोरकर यांना राज्यात चौथा क्रमांक

Written By LoksangharshMumbai
Updated :

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२५-२६ मध्ये देवनार कॉलनी मनपा शाळा क्र. ०१ येथील शिक्षिका श्रीमती मनिषा बबन बोरकर यांनी राज्यात चौथा क्रमांक मिळवला. त्यांनी सादर केलेला “मनाची वाहतूक – वर्तनाचे ट्राफिक सिग्नल” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भावनिक व सामाजिक विकासासाठी प्रभावी ठरला.

Manisha Borkar Secures 4th Rank In Maharashtra State Innovation Competition 2025 26
Share this news

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ मध्ये देवनार कॉलनी मनपा शाळा क्रमांक ०१ येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती मनिषा बबन बोरकर यांनी राज्यात चौथा क्रमांक पटकावत मुंबईचा मान उंचावला आहे.

प्राथमिक स्तर – पूर्वतयारी स्तर (इयत्ता तिसरी ते पाचवी) या गटामध्ये त्यांनी सादर केलेला “मनाची वाहतूक – वर्तनाचे ट्राफिक सिग्नल” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यस्तरीय तज्ज्ञ परीक्षकांकडून विशेष दखलपात्र ठरला. विद्यार्थ्यांच्या भावनिक व सामाजिक वर्तन विकासासाठी तयार करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे ‘लाल, पिवळा आणि हिरवा सिग्नल’ या संकल्पनेतून योग्य-अयोग्य वर्तनाची जाणीव विद्यार्थ्यांना प्रभावीपणे करून देण्यात येते.

पहिल्या टप्प्यातील जिल्हा स्तरावरील मूल्यमापनात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्यांची अंतिम सादरीकरणासाठी निवड झाली. दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे आयोजित नवोपक्रम सादरीकरण कार्यशाळेत त्यांनी आपल्या उपक्रमाचे संशोधनाधिष्ठित व प्रभावी सादरीकरण केले. त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांना राज्यात चौथा क्रमांकाचा सन्मान प्रदान करण्यात आला.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना श्रीमती मनिषा बोरकर यांनी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारीवर्ग, शाळा प्रशासन, सहकारी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “ही कामगिरी एकट्याची नसून सर्वांच्या सहकार्याचा हा सन्मान आहे,” असे त्यांनी नमूद केले.

श्रीमती मनिषा बोरकर यांच्या या उल्लेखनीय यशामुळे देवनार कॉलनी मनपा शाळा क्र. ०१ तसेच मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून, त्यांच्या कार्यातून इतर शिक्षकांना प्रेरणा मिळत आहे.


Related News