कुलगाममध्ये नवव्या दिवशीही चकमक; रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान शहीद, एक दहशतवादी ठार
कुलगामच्या अलाख भागात सुरु असलेल्या दहशतवादी चकमकीत रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान शहीद झाले, तर एक दहशतवादी ठार झाला. नवव्या दिवशीही गोळीबार सुरू असून सुरक्षाबळांनी परिसराला वेढा घालून कारवाई तीव्र केली आहे.

कुलगाम जिल्ह्यातील अलाख परिसरात दहशतवाद्यांशी सुरु असलेली चकमक आज नवव्या दिवशी पोहोचली असून रक्षाबंधनाच्या दिवशीच दोन जवानांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. चकमकीदरम्यान सुरक्षाबळांच्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार झाला आहे. या परिसरात रात्रभर सतत गोळीबाराचा आवाज ऐकायला येत होता.
सुरक्षाबळांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अलाख परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. ही कारवाई सुरु असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांनी जोरदार कारवाई केली, मात्र यामध्ये दोन जवान गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान शहीद झाले. त्यांचा शौर्यपूर्ण बलिदान संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या भागात आणखी दहशतवादी लपून बसल्याचा संशय व्यक्त केला जात असून सुरक्षाबळांनी परिसर सील केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कुलगाममधील ही कारवाई मागील काही दिवसांपासून सुरु असून यापूर्वीही येथे अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडील काळात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे, त्याला आळा घालण्यासाठी सेना, CRPF व स्थानिक पोलिस संयुक्त मोहीम राबवत आहेत.