एक नोंदणीसाठी १५ हजार लाच? शेतकरी त्रस्त, तलाठ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात संताप
तलाठी भ्रष्टाचार: एका नोंदीसाठी १५,००० रुपये मागणी; शेतकऱ्यांमध्ये संताप, पारदर्शक कारभाराची जोरदार मागणी.

महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे. कारण, फक्त एका नोंदणी (म्युटेशन/नोंद) किंवा ७/१२ उताऱ्यातील दुरुस्तीकरिता तलाठ्यांकडून तब्बल १५,००० रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे.
सरकारकडून ‘पारदर्शक व डिजिटल सेवा’ अशा घोषणा होत असल्या तरी जमिनीच्या नोंदींसाठी शेतकऱ्यांना अजूनही भ्रष्टाचाराच्या दलदलीतून जावे लागत आहे.
नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सांगितले :
“म्युटेशनसाठी अर्ज दिला की तलाठी उघड सांगतो – पंधरा हजार रुपये लागतील. पैसे दिले नाहीत तर काम महिनोन् महिने अडकवून ठेवतात. बँकेसाठी किंवा पीक विम्यासाठी अर्ज करायचा झाला तर शेतकऱ्याला अडचण होते.”
ही परिस्थिती फक्त नाशिकपुरती मर्यादित नाही. अहमदनगर, जळगाव, बीड, मराठवाडा या भागातूनही असेच तक्रारींचे ढग दाटून येत आहेत. शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीचा उतारा मिळवण्यासाठी लाच द्यावी लागते, हे ग्रामीण भागातील वास्तव बनले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच यावर नाराजी व्यक्त करत, “व्यवस्था लाचखोरीवर चालणार नाही. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला.



