ओला दुष्काळ जाहीर नाही, पण शेतकऱ्यांना मदतीची हमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठवाडा व राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतजमिनी खरडून गेल्या, घरे कोसळली, हजारो कुटुंबे अडचणीत आली. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि विरोधकांकडून "ओला दुष्काळ" जाहीर करण्याची मागणी होत होती.

मराठवाडा व राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतजमिनी खरडून गेल्या, घरे कोसळली, हजारो कुटुंबे अडचणीत आली. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि विरोधकांकडून "ओला दुष्काळ" जाहीर करण्याची मागणी होत होती.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की, "नियमांनुसार ओला दुष्काळ असा कोणताही शब्दप्रयोग अस्तित्वात नाही. आजवर राज्यात कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तरीदेखील शेतकऱ्यांना निराश करू नये म्हणून जशा सवलती दुष्काळ घोषित झाल्यानंतर दिल्या जातात, तशाच सवलती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत."
६० लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान
राज्यात आतापर्यंत तब्बल ६० लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला. यासाठी पहिल्या टप्प्यातच २,२१५ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, "ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीसाठी भरपाई जाहीर केली असून वितरण सुरू आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अट शिथील करण्यात आली आहे. पंचनाम्यांसाठी उर्वरित गावांना काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे."
शेतकऱ्यांना दिलासा
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, "अतिवृष्टी व पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला आम्ही दुष्काळासारखीच मान्यता दिली आहे. त्यामुळे मदत, सवलती व इतर योजना शेतकऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे."
राज्यातील सर्व भागातील शेतकरी या निर्णयामुळे थोडा दिलासा अनुभवत आहेत. मात्र नुकसानाची प्रमाण मोठं असल्याने आणखी आर्थिक मदत आणि पुनर्वसनाची मागणी वाढू लागली आहे.



